PM Vishwakarma Yojana Marathi

देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त-कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

योजनेसाठी 13,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील  मंत्रिमंडळ समितीने आज 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या  नवीन केंद्र सरकारी  योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी दिली. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार  आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त-कलाकार  आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.  

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल, तसेच 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. 1 लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय, ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.  

ही योजना देशाच्या  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल:

  • (i) सुतार
  • (ii) होडी बांधणी कारागीर
  • (iii) चिलखत बनवणारे
  • (iv) लोहार
  • (v) हातोडी आणि अवजार संच बनवणारे
  • (vi) कुलूप बनवणारे
  • (vii) सोनार
  • (viii) कुंभार
  • (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे)
  • (x) चर्मकार (पादत्राणे कारागीर)
  • (xi) मेस्त्री
  • (xii) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर
  • (xiii) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
  • (xiv) न्हावी (केश कर्तनकार)
  • (xv) फुलांचे हार बनवणारे कारागीर
  • (xvi) परीट (धोबी)
  • (xvii) शिंपी आणि
  • (xviii) मासेमारचे जाळे विणणारे.

SOURCE: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1949549